पिंपळगाव हरे. येथील जि. प. उर्दू शाळेत अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
महाराष्ट्र वाणी
पिंपळगाव हरे (ता. पाचोरा, जि. जळगाव) दि १८ :- येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक हक्कांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस कॉन्स्टेबल अरुण राजपूत यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अल्पसंख्याक समाजाला संविधानाने दिलेले हक्क, कायदेशीर संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक सलोखा याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.
या प्रसंगी शाळेच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार व कॉन्स्टेबल अरुण राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष तालीब कुतबोद्दीन शेख होते. तसेच सदस्य अश्फाक युनूस बागवान, मर्कज मस्जिदचे अध्यक्ष अश्फाक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक अ. करीम सर यांच्यासह रईस बागवान सर, अश्फाक अन्सारी सर, अब्दुल मालिक सर, अबूउबैदा सर, तौकीर सर, समरीन मॅडम, इराम मॅडम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या माध्यमातून समाजात समानता, बंधुता व कायद्याची जाणीव वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
— हक्कांची जाणीव हीच सुरक्षित व सशक्त भविष्याची गुरुकिल्ली!