72 तासांत फरार आरोपींना अटक करा; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन – एकता संघटनेचा भडगाव पोलिसांना अल्टिमेटम

72 तासांत फरार आरोपींना अटक करा; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन – एकता संघटनेचा भडगाव पोलिसांना अल्टिमेटम
72 तासांत फरार आरोपींना अटक करा; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन – एकता संघटनेचा भडगाव पोलिसांना अल्टिमेटम

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि २ :- भडगाव येथील गंभीर हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत एकता संघटना (जळगाव) व भडगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. महेश शर्मा यांना आक्रमक भूमिकेत लिखित निवेदन दिले आहे.

फरार आरोपींना 72 तासांत अटक न केल्यास जिल्हाभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

28 नोव्हेंबर 2025 रोजी कजगाव येथील भोरटेक फाटा येथे वसीम खान आणि अशरफ अली यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात वसीम खान गंभीर जखमी झाले होते.

त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबई येथील King Edward Memorial Hospital येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाही 22 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचे निधन झाले.

या प्रकरणात भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधारासह अनेक आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कठोर कलम लावण्याची मागणी

वसीम खान यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात कलम 103(1) जोडण्यात आले आहे.

एकता संघटनेने कलम 103(2) देखील लागू करून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संघटनेच्या मते या हल्ल्यात फक्त 5 नव्हे तर 20 ते 25 जणांचा सहभाग होता. त्यामुळे सर्वांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

72 तासांचा अल्टिमेटम

एकता संघटनेने पोलिस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की

72 तासांत फरार आरोपींना अटक न झाल्यास जिल्हाभर तीव्र लोकशाही आंदोलन उभारले जाईल.

पोलिसांचे आश्वासन

पोलीस निरीक्षक डॉ. महेश शर्मा यांनी शिष्टमंडळाला आश्वासन देत सांगितले की

फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. तसेच कलम 103(2) बाबत सरकारी वकिलांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

शिष्टमंडळातील पदाधिकारी

एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.

यामध्ये जाकीर कुरेशी, मोहसीन खाटीक, मुनसफ खान, एजाज शेख, जमाल कासार, कुद्दूस शेख, सद्दाम शेख, दानिश शेख तसेच जळगाव येथील ताहेर शेख, अल्ताफ शेख, आबीद शेख आणि पत्रकार अबरार मिर्झा उपस्थित होते.

“न्यायासाठीची लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू. आरोपी कितीही प्रभावशाली असले तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,” असा इशारा एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी दिला.

👉 न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हे प्रकरण आता 72 तासांत कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.