पावसामुळे परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही; मनपाची गट-क भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार, उमेदवारांना ३० मिनिटांची अतिरिक्त सूट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ७ :– छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेच्या २२२ पदांसाठी होणारी ऑनलाईन लेखी परीक्षा पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली जाणार नसून, ती पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच ८ व ९ जुलै २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी नियोजित वेळेत ३० मिनिटांची अतिरिक्त सूट देण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेअंतर्गत राज्यातील १८ शहरांतील ३१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी तीन सत्रांमध्ये तर ९ जुलै रोजी दोन सत्रांमध्ये विविध संवर्गातील पदांसाठी परीक्षा होणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक उमेदवारांनी ई-मेल, दूरध्वनी व संदेशांच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तर काही उमेदवारांनी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याची भूमिका मांडली. याशिवाय प्रसारमाध्यमांमध्ये परीक्षेबाबत विविध बातम्या प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, स्थानिक प्रशासन तसेच परीक्षा आयोजित करणारी IBPS संस्था यांच्याशी संपर्क साधून पावसाची परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षा केंद्रांची तयारी याबाबत आढावा घेतला. संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ आणि ९ जुलै रोजी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
IBPS संस्थेनेही बहुतांश उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या शहरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच महानगरपालिकेने सर्व ३१ परीक्षा केंद्रांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून केंद्रांची पाहणी पूर्ण केली असून परीक्षेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून ८ व ९ जुलै रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. सर्व उमेदवारांनी वेळेचे योग्य नियोजन करून परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.