पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून आढावा

वीजपुरवठा, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणेसह मूलभूत सुविधांची सज्जता ठेवण्याचे निर्देश

पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून आढावा
पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १३ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असलेल्या मतमोजणी केंद्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा, मतपेट्या सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था, मतमोजणी कक्ष, नियमित व पर्यायी वीजपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिकेची उपलब्धता तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. मतमोजणीच्या प्रक्रियेत वीजपुरवठ्यामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मतमोजणीच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रवेश व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांची पूर्तता वेळेत करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले. मतमोजणी केंद्रावरील सर्व व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., महानगरपालिका आयुक्त अमोल ऐडगे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित