पत्रकारांच्या मुलांसाठी सुवर्णसंधी! ‘एमपीएससी-यूपीएससी’ मोफत कोचिंगसाठी ऐतिहासिक करार

पत्रकारांच्या मुलांसाठी सुवर्णसंधी! ‘एमपीएससी-यूपीएससी’ मोफत कोचिंगसाठी ऐतिहासिक करार

महाराष्ट्र वाणी

पुणे (प्रतिनिधी) दि १ :- राज्यातील तसेच देशभरातील पत्रकार कुटुंबांसाठी दिलासा देणारी आणि भविष्य घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ आणि पुण्यातील ख्यातनाम ‘भगीरथ आयएएस अकॅडमी’ यांच्यात महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे.

या करारामुळे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’शी संलग्न पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांसाठी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनात जाण्याचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी नवे दार खुले झाले आहे.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे किंवा शहरात राहण्याच्या समस्येमुळे मागे राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ घर, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि निवृत्ती नियोजन या पंचसूत्रीवर सातत्याने काम करत आहेत. यापूर्वीही शिक्षण, समुपदेशन, वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले असून या नव्या करारामुळे त्या उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे.

करारानुसार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्य असलेल्या पत्रकारांच्या मुलांना ‘भगीरथ अकॅडमी’मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी पुण्यात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी घरबसल्या ऑनलाईन अभ्यासाची सोय देखील उपलब्ध राहणार आहे. प्रवेशासाठी संबंधित पत्रकाराचे ओळखपत्र, सदस्य क्रमांक आणि जिल्हाध्यक्षांचे शिफारस पत्र आवश्यक राहणार आहे.

‘भगीरथ’ संस्थेची स्थापना २००६ साली संस्थापक संचालक रंजन कोळंबे यांनी केली असून आज राज्यभर या संस्थेचे जाळे विस्तारले आहे. आतापर्यंत या संस्थेमार्फत २० हजारांहून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले असून २०० पेक्षा अधिक आयएएस-आयपीएस अधिकारी घडविण्याचा मान संस्थेला मिळाला आहे.

या करारावर रंजन कोळंबे, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार आणि शैक्षणिक विंग प्रमुख चेतन कात्रे यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी व्यवस्थापक सुरजकुमार पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रंजन कोळंबे म्हणाले की, “पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतात, पण अनेकदा त्यांच्या स्वतःच्या घरातील प्रश्न कायम राहतात. त्यांच्या मुलांनी सक्षम व्हावे आणि मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, या हेतूने हा उपक्रम राबवला आहे.”

संदीप काळे यांनी हा करार पत्रकारांच्या मुलांच्या भविष्यासाठी निर्णायक टप्पा असल्याचे सांगितले, तर चेतन बंडेवार यांनी सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. चेतन कात्रे यांनी जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

इच्छुक पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांनी संबंधित जिल्हाध्यक्ष किंवा शैक्षणिक विंगशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 “पत्रकारांच्या घरातूनच आता अधिकारी घडणार; स्वप्नांना मिळाला नवा आधार!”