नशेच्या गोळ्यांवर पोलिसांचा दणका! २१० नशेच्या औषधी गोळ्या जप्त; दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानाच्या गेटजवळ कारवाई करत २१० नशेच्या औषधी गोळ्या आणि एक मोबाईल असा एकूण ५१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने राहिल शेख महेमुद शेख (वय २०, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर, गारखेडा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नशेच्या २१० औषधी गोळ्या व मोबाईल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान सदर गोळ्या जुबेर ऊर्फ जुनेद समशेर पठाण, रा. हुसेन कॉलनी, सानिया शाळेजवळ, न्यायनगर, पुंडलिकनगर याच्याकडून आणल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
दरम्यान, शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती अथवा टोळ्या आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती 9684702002 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे देता येणार आहे.