“नगरसेवकांच्या सदस्यत्वावर संकट? नऊ जणांची सुनावणी पूर्ण; १५ सप्टेंबरला आणखी ११ प्रकरणे!”

“नगरसेवकांच्या सदस्यत्वावर संकट? नऊ जणांची सुनावणी पूर्ण; १५ सप्टेंबरला आणखी ११ प्रकरणे!”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ७ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील काही नगरसेवक आणि नगरसेविकांच्या सदस्यत्वावर दाखल करण्यात आलेल्या अपात्रता प्रकरणांमध्ये सुनावणीला वेग आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) आणि १० (१-D) अंतर्गत दाखल प्रकरणांवर टप्प्याटप्प्याने सुनावणी घेण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी एकूण नऊ नगरसेवकांच्या प्रकरणांची सुनावणी घेतली. यामध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम तसेच शहागंज परिसरातील अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

सुनावणी झालेल्या सदस्यांमध्ये फरजाना गुलाम रसूल, मुंशी भिकन शेख, पठाण मझर, स्वामी विश्वनाथ गुरुलिंग, अली मीर वाजेद आणि अशोक हिवराळे यांच्याविरोधातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामासंदर्भातील प्रकरणांचा समावेश आहे.

याशिवाय अब्दुल समीर यांच्याविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्यांबाबत, तर मुंशी भिकन शेख आणि पठाण मझर यांच्याविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्यांशी संबंधित अपात्रता प्रकरणांवरही सुनावणी झाली.

दरम्यान, सुनावणीदरम्यान संबंधित सदस्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुढील सुनावणीची तारीख संबंधितांना लेखी स्वरूपात कळविण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली.

पुढील टप्प्यात १५ सप्टेंबर २०२६ रोजी आणखी ११ सदस्यांच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये प्रशासनाच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.