धारदार तलवार, खुराड्यात लपवलेला गांजा… सातारा पोलिसांचा धडाकेबाज पर्दाफाश!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १७ :- धारदार तलवार बाळगून परिसरात दहशत माजवणाऱ्या इसमाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून मोठा गांजाचा साठा उघडकीस आणत सातारा पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस ठाण्याचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना कांचनवाडी, कश्मिरनगर परिसरात एका इसमाने तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनुसिंग दिपकसिंग भोंड (वय ३०, रा. कांचनवाडी स्मशानभूमी, कश्मिरनगर) याला ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार व मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये गांजा खरेदीचे पुरावे आढळले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने आपल्या घराच्या मागील बाजूस बकऱ्यांच्या खुराड्यात जमिनीत पुरून गांजा लपवून ठेवल्याची कबुली दिली.
यानुसार पोलिस पथक व फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी झडती घेतली असता तब्बल 1 किलो 209 ग्रॅम गांजा (किमत ₹24,180) आणि ₹10,000 किमतीचा व्हिवो मोबाईल असा एकूण ₹34,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शस्त्र अधिनियम व एनडीपीएस कायद्यान्वये सातारा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
👉 गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!