तरुणाच्या खूनाचा उलगडा; सिटीचौक पोलिसांनी ७ आरोपींना ठोकल्या बेड्या

तरुणाच्या खूनाचा उलगडा; सिटीचौक पोलिसांनी ७ आरोपींना ठोकल्या बेड्या
तरुणाच्या खूनाचा उलगडा; सिटीचौक पोलिसांनी ७ आरोपींना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- सिटीचौक पोलीस ठाण्याने अवघ्या काही तासांत खूनप्रकरणाचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोजेबाग परिसरात झालेल्या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना तातडीने अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्र. 293/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 जुलै 2026 रोजी रोजेबाग येथील शाहीद नुरुद्दीन चारणिया यांच्या घरासमोरील रस्ता ते व्ही क्रीमी कॅफे परिसरात घडली.

या प्रकरणी मयताचा भाऊ आमेर खान तारेख खान (वय 26, रा. शहाबाजार) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 22 जुलै रोजी रोशनगेट येथे झालेल्या जुन्या वादाचा समझोता करण्यासाठी आरोपींनी नासेर खान तारेख अहमद (वय 21) याला रोजेबाग येथे बोलावले. त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून शिवीगाळ करत चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नासेर खानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार करून गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि सापळा रचून आरोपींचा शोध सुरू केला. काही तासांतच सात आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहीद नुरुद्दीन चारणिया, शेख कदीर उर्फ अमीज उर्फ माया, खेदुर रहेमान पटेल, अविनाश अमोल भोसले उर्फ क्रिश बाबा, शेख राफे रईसुद्दीन, अक्षय विजय शिरसाठ आणि एका 17 वर्षीय अल्पवयीनाचा समावेश आहे. तर शहेबाज (रा. सिद्धार्थनगर, एन-12 हडको) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS), पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक रविंद्र सांगळे, सपोनि मनोज शिंदे, पोअनि संतोष खरात, भागवत मुठाळ, प्रमोद कोळेकर, संजय राठोड तसेच सिटीचौक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र सांगळे करीत आहेत.