छत्रपती संभाजीनगरात विरोधकांना धक्का; उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- शहरातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी घडामोड सोमवारी (दि. १ सप्टेंबर) घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटासह काँग्रेसमधील विविध लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या नेते व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा समावेश आहे. तसेच नगरसेविका कुरेशी हलीमाबी अब्दुल मजीद, नगरसेवक पठाण जावेद याकुब खान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका सय्यद चिस्ती मसरत जफर, नियोजन व दिवाबत्ती समितीचे सभापती तथा नगरसेवक सुषमेष प्रधान आणि सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती तथा नगरसेविका अर्चना दुतोंडे यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
काँग्रेसमधून नगरसेवक जमीर सगिर पठाण, प्रशांत राजेंद्र नागरे, अरशिया रिजवान खान आणि हिना मुद्द्सर पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर शिवसेना (उबाठा) गटातील ऋषिकेश घाट, आदित्य पाटील आणि भगवान पाटील यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रवेशकर्त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, विलास भुमरे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.