छत्रपती संभाजीनगरात बोगस खतांचा मोठा भंडाफोड! भरारी पथकाची धडक कारवाई; लाखोंचा साठा जप्त, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरात बोगस खतांचा मोठा भंडाफोड! भरारी पथकाची धडक कारवाई; लाखोंचा साठा जप्त, गुन्हा दाखल

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खत विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत लाडसावंगी येथील एका कृषी सेवा केंद्रावर धाड टाकून बोगस खतांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मा. आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य श्री सुरज मांढरे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., मा. संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय पुणे श्री सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक श्री सुनील वानखेडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. 28 जून 2026 रोजी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेच्या भरारी पथकाने ओम कृषी सेवा केंद्र, लाडसावंगी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे तपासणी केली. तपासादरम्यान इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीच्या नावाने बोगस म्युरेट ऑफ पोटॅश खत तसेच ईल्लिनोइस् केमिकल अँड फर्टीलायझर, गोरेगाव मुंबई यांच्या नावाने अनधिकृतपणे विक्रीस ठेवलेले एनपीके 10:20:20 दाणेदार मिश्र खत आढळून आले.

भरारी पथकाने विक्री केंद्र आणि गोदामाची तपासणी करून संशयित बोगस खतांचा साठा जप्त केला. संबंधित खतांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

या कारवाईत कृषी विकास अधिकारी तथा खत निरीक्षक श्री प्रकाश पाटील, मोहीम अधिकारी श्री पंकज ताजने, खत निरीक्षक श्री श्रीकृष्ण बंडगर, श्री दिनकर जाधव आणि श्री गोविंद पौळ यांच्या पथकाने इंडियन पोटॅश लिमिटेडचे प्रतिनिधी श्री शिवाजी ठवरे यांच्या उपस्थितीत कारवाई केली.

दरम्यान, शासनाच्या वतीने खत निरीक्षक श्री गोविंद पौळ यांनी दि. 29 जून रोजी करमाड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

👉 शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस खत माफियांविरोधात प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात आहे!