गॅस सिलिंडरवर ‘लूट’ थांबवा! शिवसेना (उबाठा)चा इशारा – उद्या एजन्सींविरोधात आंदोलन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर चढ्या दराने विकणाऱ्या एजन्सी धारकांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आक्रमक झाली असून, शहरात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार (ता. 26 मार्च) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार शुक्रवार (ता. 27 मार्च) रोजी संभाजीनगरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना थेट भेट देत निवेदन देण्यात येणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींनी पेटला मुद्दा
शहरातील विविध भागांत गॅस सिलिंडर जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रशासनाला इशारा
चढ्या दराने विक्री करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेनेच्या बैठकीत देण्यात आला आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
👥 प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी महापौर, नगरसेवक, महिला आघाडी व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गॅसच्या वाढत्या दरांवर आता राजकारण तापणार का? नागरिकांच्या खिशाला दिलासा मिळणार का?” – याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!