गुंठेवारीत अभियंते-आर्किटेक्टकडून होणारी आर्थिक लूट थांबवा : काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम

५० टक्के सवलतीच्या गुंठेवारी योजनेचे काँग्रेसकडून स्वागत; आवक-जावक रजिस्टर ठेवण्याची आयुक्तांकडे मागणी

गुंठेवारीत अभियंते-आर्किटेक्टकडून होणारी आर्थिक लूट थांबवा : काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम
गुंठेवारीत अभियंते-आर्किटेक्टकडून होणारी आर्थिक लूट थांबवा : काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- शहरात ५० टक्के सवलतीत सुरू करण्यात आलेल्या गुंठेवारी योजनेचे स्वागत करतानाच, या प्रक्रियेत नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन दिले. गुंठेवारीसाठी मालमत्ताधारकांकडून अभियंते व आर्किटेक्ट मोठ्या प्रमाणात शुल्काची मागणी करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. काही ठिकाणी ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जात असल्याचे अॅड. सय्यद अक्रम यांनी म्हटले आहे.

गुंठेवारीच्या प्रत्येक प्रकरणाची पारदर्शक नोंद राहावी यासाठी महापालिकेने आवक-जावक रजिस्टर ठेवावे, तसेच संबंधित मालमत्ताधारकाने स्वतः चलन भरून फाईल महापालिकेत दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभियंता किंवा आर्किटेक्टकडून फाईल तयार करण्यासाठी केवळ नाममात्र शुल्क आकारावे. फाईलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या वारंवार नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावण्याऐवजी एका पत्राद्वारे सर्व त्रुटी व आवश्यक कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे द्यावी, अशी सूचनाही काँग्रेसने केली आहे.

महापालिका प्रशासनाने सुरू केलेली ५० टक्के सवलतीची गुंठेवारी योजना गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असून, तिचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थांकडून होणारी आर्थिक लूट थांबविणे आवश्यक असल्याचे अॅड. सय्यद अक्रम यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण यांच्यासह शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.