खत खरेदीवर सक्ती करणाऱ्यांची आता खैर नाही! शेतकऱ्यांना दिलासा; कृषी विभागाचे कडक आदेश

खत खरेदीवर सक्ती करणाऱ्यांची आता खैर नाही! शेतकऱ्यांना दिलासा; कृषी विभागाचे कडक आदेश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनुदानित खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांना बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, कीटकनाशके किंवा इतर कोणतेही कृषी साहित्य सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादनेही खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. "खत हवे असेल तर हेही घ्यावे लागेल" असे सांगून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त खर्च करून घेतला जात होता. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

कृषी विभागाच्या आदेशानुसार, कोणत्याही विक्रेत्याला अनुदानित खतांसोबत इतर कृषी साहित्य खरेदी करण्याची अट घालता येणार नाही. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत स्वतंत्रपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

यापुढे जर एखादा विक्रेता खतांसोबत इतर साहित्य खरेदी करण्याची सक्ती करताना आढळला, तर त्याच्याविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यासह अन्य कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

कृषी विभागाने शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या सक्तीला बळी पडू नये. खत खरेदी करताना अशा प्रकारचा अनुभव आल्यास त्याची तक्रार तात्काळ कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयात करावी.

खतांचा हंगाम सुरू असताना कृषी विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अनावश्यक आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.