ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगचे वक्फ मंडळाकडे पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन; सीईओंकडून सकारात्मक आश्वासन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगच्या वतीने बुधवारी (दि. ३) दुपारी ३ वाजता पानचक्की येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यालयात मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान यांना पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
निवेदनामध्ये वक्फ संस्थांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३६ अंतर्गत नवीन नोंदणी प्रकरणांवर लवकर आदेश देणे, कलम ४१ अंतर्गत दाखल सर्व प्रकरणे निकाली काढणे, तसेच मुतवल्ली पदाच्या ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीऐवजी कायमस्वरूपी नियुक्ती आदेश देणे यांचा समावेश होता.
याशिवाय, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देणे आणि वक्फ बैठकीत सुनावणी पूर्ण होऊन ‘क्लोज फॉर ऑर्डर’ करण्यात आलेल्या प्रकरणांचे आदेश तातडीने जाहीर करणे या मागण्याही करण्यात आल्या.
निवेदनात नमूद करण्यात आले की, या पाचही मागण्या मंजूर झाल्यास मुतवल्ली, ट्रस्टी, खादिम, मशिदींचे अध्यक्ष, कब्रस्तान व दर्ग्यांचे मुजावर तसेच विविध वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संस्थांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान यांनी उपस्थित मुतवल्ली व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, सादर करण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून संबंधित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास वक्फ बोर्डाचे अध्यक्ष खुसरो खान यांची उपस्थिती होती.
निवेदन सादर करताना शेख फैसल इक्बाल (मुतवल्ली, बीबी का मकबरा), उस्मान हबीब खान (मुतवल्ली, सय्यद सादात दर्गा), शाकेर चिस्ती (जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया), सय्यद फहीमुद्दीन शुतारी (सज्जादे नशीन, दर्गा हजरत शेखन अवलिया), रहीम खान, सैय्यद कलीमउद्दीन शुतारी, शेख मुजीब मुजावर (पैठण), अश्रफ खादरी (परभणी), शेख अजीज इसा शेख, शमशुद्दीन अमीनुद्दीन यांच्यासह मोठ्या संख्येने मुतवल्ली व पदाधिकारी उपस्थित होते.
— वक्फ संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करत मुतवल्लींनी प्रशासनाकडून तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे.