शहराला जपानी गुंतवणूक व पर्यटनाची नवी संधी; महापौर समीर राजुरकर यांच्याशी एफटीजे इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांची चर्चा

शहराला जपानी गुंतवणूक व पर्यटनाची नवी संधी; महापौर समीर राजुरकर यांच्याशी एफटीजे इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांची चर्चा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- जपानमधील उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने एफटीजे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कोजी कानाझावा यांनी आज महापौर समीर राजुरकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहराच्या औद्योगिक, पर्यटन आणि सांस्कृतिक विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

एफटीजे इंडिया ही जपानमधील अग्रगण्य फ्रंटियर टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडची भारतीय उपकंपनी असून, भारत आणि जपानमधील औद्योगिक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.

बैठकीदरम्यान श्री. कानाझावा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाधिक जपानी उद्योग, गुंतवणूकदार आणि पर्यटक आकर्षित करण्यासाठी शहरातील सरकारी सेवा, पर्यटनस्थळे तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती जपानी भाषेत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला.

महापौर समीर राजुरकर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत, शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत करण्यासाठी महानगरपालिका आणि एफटीजे इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जपानी पर्यटक व उद्योजकांसाठी जपानी भाषेतील माहितीपूर्ण माहितीपत्रक (ब्रॉशर) तयार करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले.

या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जपान यांच्यातील औद्योगिक, पर्यटन व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. तसेच भविष्यात जपानी कंपन्यांची गुंतवणूक, औद्योगिक सहकार्य आणि जपानी पर्यटकांची संख्या वाढण्यासही या निर्णयामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.