ऑनलाईन चक्री जुगारावर एमआयडीसी पैठण पोलिसांची धडक कारवाई; ₹52,200 चा मुद्देमाल जप्त

ऑनलाईन चक्री जुगारावर एमआयडीसी पैठण पोलिसांची धडक कारवाई; ₹52,200 चा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि.१८ :- एमआयडीसी पैठण पोलिसांनी ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ₹52,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुरन क्र. 185/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दशरथ विश्वनाथ बुरकुल (वय 40) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 18 जून) सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास मौजे बालानगर येथील डोणगाव फाटा परिसरातील हॉटेल जय मल्हारच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी राजू मदन भुगरे (वय 30, रा. खेर्डा, ता. पैठण) हा लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाईन चक्री नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹50,000 किमतीचा QUADRIX कंपनीचा LED स्क्रीन, ZEBRONICS कंपनीचा CPU, ₹1,000 किमतीचा LAPCARE कंपनीचा कीबोर्ड व माऊस तसेच आरोपीकडील ₹1,200 रोख रक्कम असा एकूण ₹52,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हा गुन्हा एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यापासून सुमारे 20 किलोमीटर पूर्व दिशेला उघडकीस आला. पोलीस नाईक गोपाळघरे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक भवर करीत आहेत.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी!