आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शेख हसनैन कलीमची निवड; एच. जे. थिम महाविद्यालयाचा गौरव

आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शेख हसनैन कलीमची निवड; एच. जे. थिम महाविद्यालयाचा गौरव
आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शेख हसनैन कलीमची निवड; एच. जे. थिम महाविद्यालयाचा गौरव

विशेष प्रतिनिधी | जळगाव दि १९ :- जळगाव येथील इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थिम महाविद्यालयातील एम.ए. उर्दू द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शेख हसनैन कलीम याने फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याची आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेख हसनैन कलीम हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकृत फुटबॉल संघातून या स्पर्धेत सहभागी होणार आहे. अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी तो रवाना होत आहे. विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवणे ही त्याच्या क्रीडा कौशल्याची आणि मेहनतीची पावती मानली जात आहे.

या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सलार, संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेख हसनैनचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय आणि विद्यापीठाचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा दिल्या.

शेख हसनैनच्या या यशामागे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. चांद खान यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळाले.

शेख हसनैनच्या निवडीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित