✈️ विमानतळाजवळ लेझर-बीम लाईट्सवर कडक बंदी! १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ पर्यंत आदेश लागू

✈️ विमानतळाजवळ लेझर-बीम लाईट्सवर कडक बंदी! १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ पर्यंत आदेश लागू

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि १३ :- विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानतळ परिसरातील फार्महाऊस, मंगल कार्यालये, विवाह सोहळे तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

ही बंदी दि. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार असून, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.

पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करत स्पष्ट केले आहे की, विमानतळाजवळ अशा प्रकारच्या लाईट्सचा वापर झाल्यास पायलटच्या दृष्टीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लँडिंग व टेकऑफच्या वेळी लक्ष विचलित होऊन गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये तसेच अन्य प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

✨ विमानतळ सुरक्षेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

🔔 अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी वाचत राहा “महाराष्ट्र वाणी”!