१५ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याचा वडिलांचा संशय! जिन्सी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- शहरातील बाबर कॉलनी परिसरातून १५ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर घराबाहेर जाऊन येतो, असे सांगून बाहेर पडलेला मुलगा अद्याप घरी परतला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दानिश खान मेहबूब खान (वय १५, रा. बाबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घरातील मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर दानिशने घराबाहेर जाऊन येतो, असे सांगून घर सोडले. मात्र, बराच वेळ उलटूनही तो परतला नाही.
दानिश घरी न आल्याने त्याचे वडील मेहबूब खान, आई आणि नातेवाईकांनी परिसरात तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि शहरातील विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही दानिशचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर वडिलांनी २७ नोव्हेंबर रोजी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
बेपत्ता मुलाचे वर्णन
दानिशची उंची सुमारे ४ फूट ६ इंच असून रंग सावळा, चेहरा लांब, नाक सरळ, केस काळे आणि डोळे काळे आहेत. त्याची शरीरयष्टी मध्यम आहे. बेपत्ता झाला त्यावेळी त्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. पायात काळ्या रंगाच्या चपला होत्या. तो हिंदी भाषा बोलतो.
जिन्सी पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा क्रमांक ३९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप मधुकर गाडगे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, १५ वर्षीय दानिशचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, तो कुठे आढळल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने जिन्सी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.