१५ वर्षांचा विकासाचा दुष्काळ संपवण्यासाठी मेराज खान मैदानात — प्रभाग १३ मध्ये सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

१५ वर्षांचा विकासाचा दुष्काळ संपवण्यासाठी मेराज खान मैदानात — प्रभाग १३ मध्ये सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान
१५ वर्षांचा विकासाचा दुष्काळ संपवण्यासाठी मेराज खान मैदानात — प्रभाग १३ मध्ये सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :-   

रोशन गेट परिसरातील प्रभाग क्रमांक १३ गेल्या तब्बल १५ वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेचा बळी ठरत असून, विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांची धूळ नागरिकांच्या डोळ्यांत टाकली गेली आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रभागातील जनतेच्या आग्रहाखातर उच्चशिक्षित, अभ्यासू आणि संघर्षशील तरुण नेतृत्व मेराज खान यांनी आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. “प्रभाग १३ ला मागास ठेवणाऱ्यांना आता जाब विचारला जाणार” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

मेराज खान हे उच्चशिक्षित एम.आर. (Medical Representative) असून सामाजिक प्रश्नांची जाण, प्रशासनातील प्रक्रियांचे सखोल ज्ञान आणि प्रभागातील प्रत्येक गल्लीशी असलेला मजबूत जनसंपर्क ही त्यांची मोठी ताकद आहे. विशेष म्हणजे, पत्रकारितेचा अनुभव असल्याने जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची भाषा, व्यासपीठ आणि धार त्यांना पुरेपूर अवगत आहे.

प्रभागातील मकसूद कॉलनी, करीम कॉलनी, मुजीब कॉलनी, भीम संदेश नगर, रवींद्र नगर, कैसर कॉलनी, नागसेन कॉलनी, वाहेद कॉलनी, गंजेशहिदा मस्जिद परिसर, जीन्सी, चंपा मस्जिद, बारी कॉलनी, टाकळकर हौसिंग सोसायटी, इंदिरानगर (उत्तर), बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, जसवंतपुरा, राममंदिर किराडपुरा आदी भागांतील नागरिक वर्षानुवर्षे प्रश्नांची यादी घेऊन फिरत आहेत; मात्र निवडणुकीपुरतेच त्यांची आठवण काढली गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

“प्रभाग १३ कोणाच्या खासगी मालकीचा नाही. इथे विकास होणारच. निधी नाही, फाईल अडली, वरून आदेश नाही — ही कारणे आता चालणार नाहीत,” असा ठाम पवित्रा मेराज खान यांनी व्यक्त केला. निधी आणण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष, गरज पडल्यास आंदोलन आणि रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

उच्च शिक्षण, तरुणाईचा जोश, स्पष्ट राजकीय भूमिका आणि लोकांच्या प्रश्नांसाठी झगडण्याची ठाम तयारी यामुळे मेराज खान हे प्रभाग १३ मधील सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येथे राजकीय भूकंप होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

— आता प्रश्न एवढाच, १५ वर्षांची विकासाची प्रतीक्षा संपवण्याची संधी मतदार देणार का?