"‘हिंदी’ विरोधात ‘ठाकरे’ बंधू एकत्र – महाराष्ट्र म्हणतो, ‘हीच ती वेळ!’"

"‘हिंदी’ विरोधात ‘ठाकरे’ बंधू एकत्र – महाराष्ट्र म्हणतो, ‘हीच ती वेळ!’"

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २८ जून (प्रतीनीधी) :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाचे आणि आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांची भाषा इतकी खालच्या थराला गेली आहे की, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली आहे. रोज कुठलातरी नेता एखाद्या समाजावर टिका करतोय आणि हे सगळं पाहणाऱ्या जनतेचा संयम सुटू लागला आहे.

अशा अस्थिर परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या "प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीच्या" निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही समर्थन लाभले आहे.

यामुळे गेल्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या वेगळ्या वाटा चालणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या एकजुटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली असून, सामान्य जनतेतूनही "हीच ती वेळ – ठाकरे बंधू एकत्र यावेत" अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून सातत्याने भूमिका घेतली आहे. यावेळेस हिंदीच्या सक्तीविरोधातील भूमिकेत त्यांना उद्धव ठाकरे यांचे समर्थन मिळणे म्हणजे मराठी जनतेसाठी एक सकारात्मक संकेत मानला जातोय.

जनतेचा सूर : "राजकीय मतभेद बाजूला ठेवा"

महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. "मराठी अस्मितेच्या लढ्यात ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावे, याहून मोठा आनंद नसेल," अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

एकत्र येण्याची सुरुवात, की फक्त एक मोर्चा?

राजकीय विश्लेषकांच्या मते, हे फक्त एक मुद्द्यापुरतं एकत्र येणं असू शकतं, पण या निमित्ताने पुन्हा एकत्रित होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण बदल घडवू शकतं.

 ५ जुलै रोजी मुंबईतील मोर्चा हा केवळ हिंदीविरोधी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचा शंखनाद ठरू शकतो.

 थोडक्यात – ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने महाराष्ट्रात आशेचा किरण दिसतोय, आणि जनता म्हणतेय...

"हीच ती वेळ – एकत्र येण्याची!"