अल्पसंख्याक विकासासाठी शासन कटिबद्ध; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि १६ :- राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. आज अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच विभागाची वाटचाल व्हावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सच्चर समितीच्या शिफारशीनुसार २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची स्थापना करण्यात आली असून, विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना, जैन महामंडळाच्या थेट कर्ज व व्याज परतावा योजना, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजना राबविल्या जात आहेत.
शैक्षणिक कर्ज मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली
मौलाना आझाद महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून थेट २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंनाच मिळेल याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.
मदरसा आधुनिकीकरणासाठी अनुदान १० लाखांपर्यंत
राज्यातील ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ अंतर्गत पायाभूत सुविधांचे अनुदान २ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. पात्र संस्थांची निवड करताना पूर्ण पारदर्शकता राखण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले.
वसतिगृहे व उर्दू घरे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतिगृहे तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावीत, तसेच अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकास निधीचे समप्रमाणात वाटप होऊन उत्कृष्ट दर्जाची कामे व्हावीत, असे निर्देश देण्यात आले.
नांदेड, सोलापूर आणि मालेगाव येथील उर्दू घरे कार्यान्वित असून इतर प्रस्तावित उर्दू घरांची कामेही वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
वक्फ मंडळ व हज समितीतील रिक्त पदे तातडीने भरणार
बैठकीत वक्फ मंडळातील १७९ मंजूर पदांपैकी ९६, वक्फ न्यायाधिकरणातील ३४ पैकी २५ तसेच हज समितीतील १३ पैकी १० रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
तरुणांसाठी कौशल्यवृद्धी व रोजगारक्षम कार्यक्रम राबवणार
अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेता तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे सूचित करण्यात आले.
याशिवाय खारघर, नवी मुंबई येथे प्रस्तावित ‘श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शाहिदी समागम’ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
✨ महाराष्ट्र वाणी अपडेट: अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी विभाग अधिक सक्रिय होणार आहे!