‘हंबरडा मोर्चा’ने हादरले सरकार! – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात बळीराजाचा आक्रोश

‘हंबरडा मोर्चा’ने हादरले सरकार! – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात बळीराजाचा आक्रोश
‘हंबरडा मोर्चा’ने हादरले सरकार! – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात बळीराजाचा आक्रोश

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ :- मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि सरकारी निष्क्रियतेमुळे अक्षरशः हवालदिल झाले आहेत. शेतात उभं पीक वाऱ्याने, पावसाने आणि दुर्लक्षाने वाहून गेलं. या असहाय स्थितीत ‘बळीराजा’ने आज रस्त्यावर उतरून सरकारकडे आपल्या वेदना पोहोचवल्या. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरात झालेल्या ‘हंबरडा मोर्च्या’तून शेतकऱ्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार आक्रोश नोंदवला.

क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजी, फलक आणि शेतकऱ्यांच्या हंबरड्याने गाजला. “ओला दुष्काळ जाहीर करा”, “नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या”, “बळीराजाचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देत हजारो शेतकऱ्यांनी सरकारकडे आपली मागणी पोहोचवली.

या मोर्च्याचे नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत म्हटलं, “शेतकरी संकटात असताना मंत्र्यांचे दौरे फक्त फोटोसाठी होतात. जमिनीवरील वास्तव कोणी पाहत नाही. आम्ही दिल्ली नव्हे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत.”

मोर्च्यात युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, तसेच हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान बळीराजाने आपल्या हक्कासाठी दिलेला घोषवाक्यांचा आवाज शहरभर दुमदुमला. अनेक शेतकऱ्यांनी हातात ओल्या शेतीतील फोटो, सुकलेली पिके, आणि सरकारकडून मदतीची मागणी करणारे फलक घेतले होते.

शिवसेनेच्या या आंदोलनामुळे महायुती सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला असून, राज्य सरकारने आता तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी ठामपणे पुढे आली आहे.

“बळीराजाचा हंबरडा आता केवळ आवाज नाही, तो सरकारला जागवणारा इशारा आहे!”