बजाजनगरचा पाणीप्रश्न पेटला! १५ हजार पगार, १० हजार टँकरला – तहानलेल्या वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ आंदोलन

बजाजनगरचा पाणीप्रश्न पेटला! १५ हजार पगार, १० हजार टँकरला – तहानलेल्या वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ आंदोलन
बजाजनगरचा पाणीप्रश्न पेटला! १५ हजार पगार, १० हजार टँकरला – तहानलेल्या वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ आंदोलन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ :- आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या वाळूज MIDC परिसरात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. बजाजनगर, वाळूज आणि सिडको परिसरातील हजारो कष्टकरी कामगारांना आता कामापेक्षा पाण्यासाठीच जास्त संघर्ष करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुरेश सोनवणे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत ६ मार्च रोजी ‘घडा फोडो’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

कामगारांचा संताप उफाळला

वाळूज, बजाजनगर आणि सिडको परिसरात सुमारे १० लाखांची लोकसंख्या वास्तव्यास असून त्यातील बहुतांश नागरिक औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणारे कष्टकरी कामगार आहेत. मात्र, ८-८ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, १५ हजार रुपयांचा पगार असलेला कामगार दरमहा तब्बल १० हजार रुपये टँकरच्या पाण्यासाठी खर्च करत आहे. महिलांना रात्रभर जागून पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“बियर कंपन्यांना पाणी, जनतेला टंचाई?” – सोनवणे

पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश सोनवणे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला.

औद्योगिक क्षेत्रातील बियर उत्पादक कंपन्यांना मुबलक पाणी पुरवले जाते, मात्र सामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर या कंपन्यांचे पाणी कनेक्शन तोडून ते जनतेकडे वळवण्याचा इशारा त्यांनी दिला.

४० कोटींची योजना कागदावरच?

परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी ३४ ते ४० कोटी रुपयांची योजना मंजूर झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या नळात एक थेंबही पोहोचलेला नाही.

गेल्या चार वर्षांपासून केवळ पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून प्रत्यक्ष पाणीपुरवठा मात्र सुरू झालेला नाही.

स्थानिक ग्रामपंचायत पूर्णपणे निष्क्रिय झाली असून फक्त कागदोपत्री योजना दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला.

६ मार्चला ‘घडा फोडो’ आंदोलन

या भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ ६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता धुळे–सोलापूर हायवेवरील खवडा डोंगर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘घडा फोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

जोपर्यंत नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 पाणी नसल्याने कामगारांचे जगणेच कठीण झाले आहे; आता वाळूजचा पाणीप्रश्न आंदोलनाच्या ज्वाळांनी पेटणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.