‘मराठी राजभाषा दिन’ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांत उत्साहात; ग्रंथ दिंडी व मराठी संवर्धनाची शपथ

‘मराठी राजभाषा दिन’ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांत उत्साहात; ग्रंथ दिंडी व मराठी संवर्धनाची शपथ
‘मराठी राजभाषा दिन’ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांत उत्साहात; ग्रंथ दिंडी व मराठी संवर्धनाची शपथ

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- ग्रामीण पोलीस दलातर्फे ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात ग्रंथ दिंडी, प्रतिमा पूजन आणि मराठी भाषेच्या संवर्धनाची सामूहिक शपथ यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड म्हणाले की, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. पोलीस दलात काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यापासून ते तपासापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेचा वापर अधिक प्रभावी, स्पष्ट आणि संवेदनशीलतेने व्हायला हवा. आपली मायबोली जितकी समृद्ध होईल, तितकाच पोलीस आणि जनतेतील विश्वास अधिक दृढ होईल.”

पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथे सकाळी १०.३० वाजता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. राठोड तसेच अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनीही मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकताना सांगितले की, “मराठी भाषेचा वारसा संतांच्या अभंगांपासून ते आधुनिक साहित्यापर्यंत पसरलेला आहे. पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याने या भाषेतील गोडवा आणि स्पष्टता आत्मसात करावी, जेणेकरून जनतेशी संवाद साधताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.”

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कार्यालयीन परिसरात आकर्षक ‘ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा तसेच आधुनिक मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा आणि दैनंदिन कामकाजात मराठीचाच वापर करण्याचा सामूहिक संकल्प केला.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.

मराठीचा सन्मान आणि संस्कृतीचे जतन—याच संदेशाने ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करत ग्रामीण पोलिसांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.