अझर पठाण यांची हॉकर्स पॉलिसीची जोरदार मागणी; संभाजीनगरात ७३ हजार फेरीवाल्यांसाठी नवे सर्वेक्षण आणि QR-कोड प्रमाणपत्राची सूचना!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- शहरातील वाढते अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत ‘हॉकर्स पॉलिसी’ तातडीने लागू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अझर पठाण यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्यासोबत दिनांक 2 मार्च रोजी शहरातील ज्वलंत प्रश्नांवर आणि विशेषतः हॉकर्स पॉलिसीवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत ‘वेलकम सामाजिक संस्था’चे अझर पठाण, जफर पठाण आणि इमरान बाशवान हे उपस्थित होते. शहरातील फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, तसेच अतिक्रमण आणि वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी ठोस नियोजनाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चर्चेदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत QR-कोड आधारित डिजिटल प्रमाणपत्र प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली. या प्रणालीमुळे अधिकृत फेरीवाल्यांची ओळख स्पष्ट होईल आणि व्यवस्थेत पारदर्शिताही वाढेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, २०२० मध्ये शहरात सुमारे १४ हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले होते. मात्र आजही हजारो फेरीवाले वेंडिंग सर्टिफिकेटच्या प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे सध्या फेरीवाल्यांची संख्या सुमारे ७३ हजारांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे २०२६ च्या अर्थसंकल्पात नव्याने सर्वेक्षण करून टाउन वेंडिंग कमिटी (TVC) सक्रिय करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ‘स्ट्रीट वेंडर्स अॅक्ट २०१४’ अंतर्गत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण आणि PM SVANidhi योजनेचा लाभ प्रत्येक पात्र फेरीवाल्यांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला.
हॉकर्स पॉलिसी लागू झाल्यास हजारो फेरीवाल्यांना दिलासा मिळणार का? आता शहराचे लक्ष महानगरपालिकेच्या निर्णयाकडे लागले आहे.