"स्वातंत्र्यानंतरही मुस्लिमांना 'व्हिलन' का ठरवलं जातं?" – नागपूरमधून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

महाराष्ट्र वाणी न्युज
नागपूर : दि२९ जून :- "स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत देशातील मुस्लिमांना सातत्याने 'व्हिलन' म्हणून रंगवण्यात आले. आता तरी त्यांची सुटका होणार की नाही?" – असा थेट आणि ठाम सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्षेत्रातच उपस्थित केला.
फुले-आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरमने ‘ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडी’ या विषयावर रविवारी विशेष व्याख्यान आयोजित केले होते. कस्तुरचंद पार्कजवळील परवाना भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी भारतीय मुस्लिमांविषयीचे धारदार मत मांडले.
आंबेडकर म्हणाले की, "भारतीय मुस्लिमांचा आणि पाकिस्तानातील मुस्लिमांचा काहीही संबंध नाही. भारतातील मुस्लिम समाजात संत परंपरा आहे – ही परंपरा पाकिस्तानात आढळत नाही. तरीही त्यांच्याकडे 'पाकिस्तानी' म्हणून पाहिले जाते, हा अन्याय आहे."
ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्याच्या काळापासून धर्मांध शक्तींनी मुस्लिम समाजाविषयी भीती पसरवण्याचे कार्य केले आहे. आजही तेच सुरू आहे. देशाच्या एकतेसाठी ही मानसिकता तातडीने बदलली पाहिजे."
काश्मीर धोरणामुळे बाबासाहेबांचा पराभव : आंबेडकरांचा आरोप
कार्यक्रमात बोलताना ॲड. आंबेडकर यांनी इतिहासाचा संदर्भ देत सांगितले की, "बाबासाहेब डॉ. आंबेडकरांनी काश्मीर प्रश्नावर ठाम भूमिका घेतली होती. 'काश्मीर भारतात घ्या किंवा कायमचा सोडून द्या' हे त्यांचे स्पष्ट मत होते. मात्र त्यावेळी काँग्रेस, डावे आणि हिंदू महासभेने त्याला विरोध करून बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केलं."
ते म्हणाले की, "काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेण्यात आला आणि आजही तो चिघळलेला आहे. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले याच चुकीच्या धोरणाची परिणती आहे.
आंबेडकर यांनी आजच्या राजकारणावरही निशाणा साधत म्हटले की, "आजचे राजकारणी देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. जुन्या चुका उगाळत विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष हटवले जाते. ही प्रवृत्ती अत्यंत धोकादायक आहे.
"देश एकसंघ ठेवायचा असेल, तर मुस्लिमांविषयीचा दृष्टिकोन बदलणं आता अपरिहार्य आहे!" – आंबेडकरांचा सजग इशारा
"धर्माच्या नावावर विभागलं, तर देश एकत्र कसा राहील?" – या प्रश्नाचं उत्तर शोधायची वेळ आता आली आहे...