सीएसएन फर्स्टतर्फे नवनियुक्त महापौर समीर राजूरकर यांचा सत्कार! छत्रपती संभाजीनगर येथे आयआयटी स्थापनेची ठाम मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- सीएसएन फर्स्ट या शहर नागरिक मंचातर्फे नव्याने निवडून आलेले महापौर श्री. समीर राजूरकर यांचा सत्कार करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
राज कुटीर येथे पार पडलेल्या या बैठकीस महानगरपालिका आयुक्त श्री. जी. श्रीकांत, भाजप शहराध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयआयटी कॅम्पसची गरज – रितेश मिश्रा
सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष श्री. रितेश मिश्रा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयआयटी (Indian Institute of Technology) स्थापन करण्याची ठाम मागणी केली.
मराठवाडा शिक्षण व उद्योग क्षेत्रात सक्षम असतानाही येथे राष्ट्रीय दर्जाची केंद्रीय तांत्रिक संस्था नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित असून २ ते ३ लाख रोजगारनिर्मितीची क्षमता आहे, त्यातील किमान ५० हजार तांत्रिक रोजगार उपलब्ध होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘अपेक्षा नामा’ सादर, सात प्रमुख कार्यक्षेत्रांचा रोडमॅप जाहीर
सीएसएन फर्स्टतर्फे मनपाकडे २१ विषयांवर आधारित ‘अपेक्षा नामा’ सादर करण्यात आला. तसेच पुढील पाच वर्षांसाठी सात प्रमुख व्हर्टिकल्सचा रोडमॅप मांडण्यात आला.
यामध्ये –
सिटी इन्फ्रास्ट्रक्चर
पर्यटन
क्लीन अँड ग्रीन सीएसएन
शिक्षण
क्रीडा व युवा सहभाग
सिटी ब्रँडिंग
सीएसएमआरडीए
या क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी एआय-आधारित नागरिक मोबाईल अॅपचा प्रोटोटाइपही सादर करण्यात आला.
कचरा व पाणी प्रश्नांवर तातडीने काम – महापौर राजूरकर
सत्कार स्वीकारताना महापौर समीर राजूरकर यांनी शहरातील कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
महापालिकेची प्रतिमा बदलण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर ‘लव्हेबल आणि लिव्हेबल’ बनविण्याचा निर्धार – आयुक्त श्रीकांत
आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, गेल्या अडीच वर्षांत प्रशासनाची जबाबदारी एकट्याने सांभाळली असून आता लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शहर अधिक सुंदर व सुयोग्य बनविण्यासाठी प्रकल्प प्रभावीपणे राबविता येतील.
भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन दिले.
‘डिस्कव्हर छत्रपती संभाजीनगर’ रील स्पर्धेची घोषणा
शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना प्रकाशझोतात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘डिस्कव्हर छत्रपती संभाजीनगर’ रील स्पर्धा राबविण्याची संकल्पना जाहीर करण्यात आली.
या बैठकीस सीएसएन फर्स्टचे अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
✨ शहराचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य — सीएसएन फर्स्टचा निर्धार!