सरकारी कर्मचाऱ्यांची शनिवारची सुट्टी रद्द करा; गणवेश-ओळखपत्र सक्तीचे करा! मनीष नरवडे यांची मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. १८ :- सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारी शनिवारची सुट्टी रद्द करावी तसेच त्यांच्यासाठी गणवेश आणि ओळखपत्र सक्तीचे करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांना सादर केले.
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी सुट्टी, त्यासोबत विविध सण-उत्सवांच्या सुट्ट्या आणि शनिवारची साप्ताहिक सुट्टी मिळत असल्याने वर्षातील बऱ्याच दिवस कार्यालयीन कामकाज थांबते. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात एका कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात, तरीही काम वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा अधिकारी कार्यालयात वेळेवर येत नाहीत किंवा मिटिंगचे कारण देत नागरिकांना कामासाठी दिरंगाई करतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सन २०२५ मध्ये एकूण ३६५ दिवसांपैकी ५२ रविवार व ५२ शनिवार मिळून १०४ दिवस तसेच सरकारने जाहीर केलेल्या २५ सुट्ट्यांपैकी २० सुट्ट्या आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांवर आहेत. म्हणजेच एका वर्षात तब्बल १२४ दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या मिळणार आहेत. याशिवाय सिक लीव्ह व कॅज्युअल लीव्ह वेगळी आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे कामे वेळेत होण्यासाठी शनिवारची सुट्टी रद्द करणे अत्यावश्यक असल्याचे मनीष नरवडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सरकारी अधिकारी व कर्मचारी गणवेश आणि गळ्यात ओळखपत्र परिधान केल्यास त्यांची स्पष्ट ओळख नागरिकांना होईल आणि प्रशासनाबद्दल जबाबदारीची जाणीव अधिक वाढेल, असेही ते म्हणाले.