"विकासाच्या नावाखाली अन्याय थांबवा!" –बी.आर.एस.पी.कडून मनपाला ठणकावणारे निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)३० जून :- विकासाच्या नावाखाली घरं-दुकाने जमीनदोस्त करणाऱ्या महापालिकेच्या कारवाईविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) ने आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांना ठणकावणारे निवेदन दिलं.
पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे व युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आलं.
निवेदनात मागणी करण्यात आली की,
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी.
अतिक्रमण हटवलेल्या नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करावे.
संजयनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रतीक कमान, जी आंबेडकरी अस्मितेचे प्रतीक होती, ती महापालिकेने हटवली असून ती त्वरित नव्याने उभारावी.
चिकलठाणा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत सन्मानपूर्वक पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
नक्षत्रवाडी येथील विस्थापित समाजबांधवांचेही पुनर्वसन तत्काळ करावे.
निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर मागण्या वेळेत मान्य झाल्या नाहीत तर BRSP संविधानिक मार्गाने जनआंदोलन छेडणार आहे.
"अतिक्रमण हटावाच्या नावाखाली आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. ही कारवाई विकास नव्हे तर अन्याय आहे," असं मत कांबळे यांनी मांडलं.
महानगरपालिकेने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
"संविधानाच्या मार्गाने संघर्ष आणि पुनर्निर्माणासाठी BRSP सज्ज!"