अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना ‘राह-वीर’ योजनेत २५ हजारांचे बक्षीस! योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा; जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.५ :- रस्ते अपघाताच्या वेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून जीव वाचविणाऱ्या सेवाभावी नागरिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अशा ‘मृत्युंजय दुतां’ना गौरवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘राह-वीर’ योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, सहाय्यक अधीक्षक अभियंता पूजा रावळे, उपविभागीय अभियंता श्रीराम ढाकणे, डी.एम. कोलते, मनपा कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप शेलर, महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर चौधरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिकेत कुलकर्णी, उपआयुक्त वाहतूक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक वाहतूक आनंद झोटे आदी उपस्थित होते. तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे निलेश साळुंखे, गौतम सिंग आणि वैष्णवी कारेकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
संयुक्त उपाययोजनांवर भर
सेव्ह लाईफ फाऊंडेशनने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे ओळखण्यात आली आहेत. जिल्ह्यात ‘शून्य अपघात अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी या ठिकाणांवरील धोके दूर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका, आरोग्य, परिवहन, गृह व शिक्षण विभागांनी संयुक्त उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले.
भौगोलिक माहिती सेवांचा वापर
अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन (जिओ-टॅगिंग) करण्यात आले असून ही माहिती भौगोलिक स्थान सेवा देणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोबाईलद्वारे पुढे येणाऱ्या धोकादायक ठिकाणांची आगाऊ सूचना मिळू शकणार आहे. तसेच अपघातानंतर जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यावरही भर देण्यात आला.
मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस
अपघातस्थळी मदत केल्यास चौकशीचा त्रास होईल या भीतीने अनेकजण मदत करण्यास पुढे येत नाहीत. मात्र ‘राह-वीर’ योजनेत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या मृत्युंजय दुतांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले जाते. त्यामुळे या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहन द्यावे, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
अपघाताच्या क्षणी दिलेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते; ‘राह-वीर’ बनून पुढे या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.