वाळूज गटात बालाजी सोनटक्केंचा दणदणीत विजय! पोलीस सेवेतली कर्तबगारी आता जिल्हा परिषदेत ‘विजयश्री’चे रूप
महाराष्ट्र वाणी (नजीमोद्दीन काजी)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ :- जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये वाळूज गट (३९) मधून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के यांनी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादी कांग्रेस कडून निवडणुक लढवत घवघवीत विजय मिळवत विजयश्री संपादन केली आहे.
मराठवाडा पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या सोनटक्के यांच्या या यशामुळे पोलीस दल, संघटनेचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस सेवेतून लोकसेवेकडे यशस्वी वाटचाल
मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेल्या सोनटक्के यांचा बहुतांश सेवाकाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला.
१९९१ बॅचचे पी.एस.आय. म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली.
पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच लातूर गुन्हे शाखेत वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अनेक गुन्ह्यांचा छडा, पारधी टोळ्यांवर धडक कारवाई
नगर जिल्ह्यातील एका बलात्कार प्रकरणासह दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत सोनटक्के यांनी राज्यभरात चर्चेत आलेली कामगिरी केली होती.
पारधी टोळ्यांच्या अभ्यासामुळे त्यांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
वाळूज ठाण्यातील स्वच्छ कारभाराचे फळ
वाळूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत गुन्हेगारांना गजाआड केले.
स्वच्छ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख कारभारामुळेच जनतेचा विश्वास मिळवत सोनटक्के यांना निवडणुकीत मोठे यश मिळाले, असे बोलले जात आहे.
२२ फेब्रुवारीला सत्कार सोहळा
विजयानिमित्त २२ फेब्रुवारी रोजी मराठवाडा पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे सोनटक्के यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दिगंबर गाडेकर व रामनाथ चोपडे यांनी दिली.
ग्रामीण विकासाला मिळणार नवी गती
सेवानिवृत्त अधिकारी जिल्हा परिषदेत निवडून आल्यामुळे ग्रामीण विकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, अशी चर्चा आहे. सोनटक्केंच्या विजयामुळे प्रशासनाचा अनुभव आता लोकप्रतिनिधीत्वाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरणार आहे.
ग्रामीण विकासाला बळ देणारा हा विजय!
अधिक बातम्यांसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी ✅