वाचनप्रेमींसाठी पर्वणी! 'राष्ट्रीय पुस्तक न्यास'ची मोबाईल पुस्तक बस शहरात दाखल
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जून:- राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) अंतर्गत "भारत की मोबाइल पुस्तक प्रदर्शनी बस" छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली असून, येथील एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलाधिपती डॉ. अंकुशराव कदम यांच्या हस्ते या पुस्तक बसचे उद्घाटन करण्यात आले. ही बस महाराष्ट्र पुस्तक परिक्रमा उपक्रमाचा भाग असून, संपूर्ण राज्यात ग्रंथप्रेमाचा जागर घडवत आहे.
या कार्यक्रमात रीड अॅन्ड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष आणि वाचन चळवळीचे प्रणेते मिर्ज़ा अब्दुल कय्यूम नदवी यांनी डॉ. कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ. रेखा शेळके, निलेश राऊत, प्रेरणा दळवी तसेच NBT चे पदाधिकारी उपस्थित होते.
पुस्तकांचे विविध प्रकार आणि खास सवलत
मोबाईल पुस्तक बसमध्ये हिंदी, मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषांतील हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्र, बालसाहित्य, विज्ञान, इतिहास, शब्दकोश यांचा समावेश आहे. प्रत्येक पुस्तकावर 10% सवलत देखील दिली जात आहे, ज्यामुळे वाचकांना ही पर्वणी ठरणार आहे.
पुस्तक बसचा दौरा व संपर्क:
NBT चे अध्यक्ष प्रो. मिलिंद मराठे व संचालक युवराज मलिक यांच्या नेतृत्वाखाली ही बस पुढील ठिकाणी थांबणार आहे:
फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथी कॉलेज, सिडको एन-५
मौलाना आझाद कॉलेज
सरस्वती भवन कॉलेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
जामा मस्जिद आमखास मैदान
बसची व्यवस्था इमरान-उल-हक करत असून, सुरेश कुमार, जगदीश रावत आणि गजराज हे बसचे नियोजन पाहत आहेत.