वंचितांच्या वाड्यावर पोहोचला दिवाळीचा प्रकाश! इद्रिस मुलतानी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी

वंचितांच्या वाड्यावर पोहोचला दिवाळीचा प्रकाश! इद्रिस मुलतानी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी
वंचितांच्या वाड्यावर पोहोचला दिवाळीचा प्रकाश! इद्रिस मुलतानी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी

लेणापूर (ता. सोयगाव) डि ८ :- समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरविण्याच्या उद्देशाने भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी ‘एक दिवा वंचितांसाठी’ हा सामाजिक उपक्रम राबविला. लेणापूर येथील आदिवासी वस्तीवर जाऊन त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलतानी यांनी आदिवासी बांधवांसोबत बसून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या.

दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, रोजगाराच्या समस्या तसेच गावातील विविध विकासकामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही इद्रिस मुलतानी यांनी यावेळी दिली.

दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात आहे, हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, मनोज राठोड यांच्यासह लेणापूर गावातील नागरिक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील वंचित घटकांसोबत सणाचा आनंद वाटून घेण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित