संकटग्रस्त कुटुंबाला माणुसकीचा आधार! येळेगावच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार प्रतापसिंह पाटील यांनी स्वीकारली
येळेगाव (जि. नांदेड) दि ७ :- कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत चार मुलींच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा वेळी मदतीसाठी पुढे येत आमदार डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांनी या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
आमदार रोहित पवार आणि आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी येळेगाव येथे संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याबाबत सकारात्मक पुढाकार घेण्यात आला.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी फोनद्वारे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित कुटुंबाच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. त्याचवेळी आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कुटुंबातील चारही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली.
शिक्षण क्षेत्रात संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणारे डॉ. पाटील यांनी या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे या मुलींच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, हा त्यांच्या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे, आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्यात सुरुवातीला माळकौठा आणि मुखेड येथील भेटी नियोजित होत्या. मात्र, स्थानिकांकडून विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी येळेगाव येथेही जाऊन दुःखग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.
घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणतीही मदत भरून काढू शकत नाही. मात्र, अशा कठीण प्रसंगी मुलींच्या शिक्षणाची चिंता दूर करण्यासाठी पुढे आलेला मदतीचा हात निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीची जबाबदारी स्वीकारणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित