राज्यात शाळा प्रवेश करमुक्तीचा धडाका, अंभईत मात्र निर्णयाची प्रतीक्षा
सिल्लोड (अंभई) दि७ जून :- नाशिक जिल्ह्यातील शिदें गाव तसेच बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील ग्रामपंचायतींनी एक सकारात्मक पाऊल उचलत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही कर आकारला जाणार नाही, असा निर्णय जून 2025 पासून लागू करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती विद्यार्थ्यांवरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी असे निर्णय घेत आहेत.
मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतीकडून अद्याप असा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य समाधान भुईगळ यांनी अंभई ग्रामपंचायतदेखील लवकरच असा निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. पण त्यानंतर काहीच हालचाल झालेली नाही.
या निर्णयासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच गावकरी देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि पालकांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे मत आहे.
ग्रामपंचायतीने लवकरात लवकर ठराव संमत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे.