मुस्लिम महिलेचा सार्वजनिक अपमान - नितीश कुमार यांना तात्काळ हटवण्याची ऑल इंडिया उलेमा बोर्डची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- लोकशाही, महिला सशक्तीकरण आणि संविधानाच्या मूल्यांचे गोडवे गाणाऱ्या देशात एका मुख्यमंत्र्यानेच सार्वजनिक मंचावर मुस्लिम महिलेचा नकाब ओढून तिच्या सन्मानाची जाहीर विटंबना करणे हा अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेली ही कृती केवळ असंवेदनशीलतेचा कळस नसून, ती स्त्रीद्वेषी मानसिकता, धार्मिक असहिष्णुता आणि सत्तेच्या अहंकाराचे उघडे प्रदर्शन असल्याचा आरोप ऑल इंडिया उलेमा बोर्ड (वक्फ विंग), छत्रपती संभाजीनगर यांनी केला आहे.
ही घटना केवळ एका मुस्लिम तरुणीचा अपमान नाही, तर देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेवर आणि संविधानिक मूल्यांवर केलेला थेट हल्ला असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीसारख्या घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर महिलांच्या वैयक्तिक पोशाखावर हात टाकत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
🛑 ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या ठाम मागण्या :
1. नितीश कुमार यांनी संबंधित तरुणीची जाहीर व बिनशर्त माफी मागावी.
2. महिलांच्या सन्मानाचा भंग झाल्याची स्पष्ट कबुली द्यावी.
3. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री पदावरून तात्काळ हटवावे.
4. प्रकरणाची गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
5. अन्यथा, देशभरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील.
अशरफ पठाण (शहर अध्यक्ष) यांची कडवट प्रतिक्रिया :
> “मुस्लिम महिलेच्या सन्मान सोहळ्यात नकाब ओढण्याचा प्रकार म्हणजे सत्तेच्या मस्तीतून केलेला घाणेरडा प्रकार आहे. अशा व्यक्तीला एक क्षणही मुख्यमंत्री पदावर ठेवणे म्हणजे महिलांच्या सन्मानाची थट्टा आहे. नितीश कुमार यांना तात्काळ हटवले पाहिजे.”
आज जर हा प्रकार दडपला गेला, तर उद्या कोणत्याही महिलेच्या सन्मानाची हमी उरणार नाही.
हा प्रश्न धर्माचा नाही — हा प्रश्न संविधानाचा, महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सत्तेच्या जबाबदारीचा आहे.