मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘मंडल नायक’ शब्बीर अहमद अंसारी यांचे निधन; जालन्यात आज रात्री दफनविधी
महाराष्ट्र वाणी
जालना, दि. २२ :– मुस्लिम ओबीसी चळवळीतील अग्रणी नेतृत्व आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य झोकून देणारे शब्बीर अहमद अंसारी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे. मरहूम यांचा दफनविधी आज रात्री ९:०० वाजता जालना येथील राजाबाग सवार पीर कब्रस्तान येथे पार पडणार आहे.
शब्बीर अंसारी हे केवळ एका संघटनेचे अध्यक्ष नव्हते, तर ते एक विचार आणि चळवळ होते. १९७०-८० च्या दशकात त्यांनी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. अंसारी, मंसूरी, सलमानी, दरजी, कुरैशी यांसारख्या कष्टकरी समाजघटकांना संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.
मंडल आयोगाच्या शिफारसी मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवण्यात त्यांची भूमिका ऐतिहासिक ठरली. त्यांनी महाराष्ट्रासह देशभर फिरून ओबीसी आरक्षण हा हक्क असल्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम मागासवर्गीयांना ओबीसी यादीत स्थान मिळाले.
२०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या “मंडलनामा” या त्यांच्या आत्मकथेत त्यांनी आपल्या संघर्षाची सविस्तर कहाणी मांडली. ही केवळ आत्मकथा नसून मुस्लिम ओबीसी चळवळीचा जिवंत दस्तावेज मानली जाते.
अंतिम काळातही ते सक्रिय राहिले. त्यांनी संविधान रक्षण आणि जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी देशभर जनजागृती केली. “हक्कासाठी लढा दिल्याशिवाय न्याय मिळत नाही” हा त्यांचा ठाम विश्वास होता.
त्यांच्या निधनामुळे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनायझेशनसमोर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना “मुस्लिम समाजाचा ज्योतिबा फुले” अशी उपमा देत श्रद्धांजली वाहिली.
"इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन"
हक्कासाठी पेटवलेली त्यांची मशाल आता पुढच्या पिढीच्या हातात उजळत राहणार आहे…