"महायुती सरकारच्या फसव्या मदतीविरोधात ‘काळी दिवाळी’; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा राज्यव्यापी निषेध आंदोलन!"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १६ :- राज्यातील शेतकरी संकटात असताना महायुती सरकारकडून जाहीर केलेल्या पॅकेजला ‘फसव्या मदतीचं आवरण’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) ने राज्यभर निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “काळी दिवाळी” साजरी करून मौन निषेध नोंदविला जाणार आहे.
शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाचं प्रचंड नुकसान झालं असून, या नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. अशा वेळी सरकारकडून खरी मदत अपेक्षित असताना, पंचनामे आणि निकषांच्या नावाखाली वेळकाढूपणा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, त्या आंदोलनानंतरही सरकारने ठोस निर्णय न घेता केवळ घोषणा करून बळीराजाला फसवलं, असा पक्षाचा आरोप आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती केंद्राच्या निदर्शनास आणून दिली आणि ‘सरसकट कर्जमाफी’ करण्याची मागणी केली होती. या सततच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने रु. ३१,५०० कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र ही मदत केवळ कागदोपत्री असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे.
शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५०,००० रुपयांची तातडीची मदत देण्याऐवजी सरकारने विविध अटी-निकषांच्या आडून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. हे शेतकऱ्यांवरील अन्याय आहे.”
याच निषेधार्थ ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन पक्षाने केलं असून, जिल्हा कार्यालयांवर काळे फलक, पक्षाचे झेंडे आणि निषेधाचे घोषवाक्यं झळकणार आहेत.
पक्षाने जिल्हानिहाय निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांना देऊन या फसव्या मदतीचा निषेध नोंदवण्याचं आणि खरी मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे.
👉 बळीराजाच्या न्यायासाठी ‘काळी दिवाळी’ — कारण दिवे विझलेत सरकारच्या निष्काळजीपणामुळे!