मनाला चटका लावणारी बातमी! काँग्रेसचे प्रदेश महासचीव डॉ. ज़फ़र अहेमद खान यांचे दुःखद निधन

मनाला चटका लावणारी बातमी! काँग्रेसचे प्रदेश महासचीव डॉ. ज़फ़र अहेमद खान यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. ज़फ़र अहेमद खान यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. खान यांनी राजकारण आणि समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. आपल्या तत्त्वांशी निष्ठा आणि पक्षाशी असलेली इमानदारी त्यांनी अखेरपर्यंत जपली.पुण्यातील एका खासगी रुग्णालयात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. जफर अहमद खान यांचे सोमवारी उशिरा रात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र अखेर त्यांनी जीवनाशी झुंज हरली.

त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही बातमी समजताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. डॉ. खान हे पक्षाचे निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून उमेदवारी दिली होती. यापूर्वी संजयनगर वार्डातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांची राजकीय वाटचाल ठळक राहिली. कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. तसेच, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलसह विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काँग्रेसशी निष्ठा राखली. त्यांच्या निधनाची बातमी शहरभर पोहोचताच सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अत्यविधी आज सायंकाळी ५:३० वाजता पिर गैब साब दर्गा कब्रस्तान येथे पार पडणार आहे.

अल्लाह तआला मरहूम डॉ. ज़फ़र अहमद खान यांना जन्नत-उल-फिरदौसमध्ये उच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा दु:खाचा डोंगर सहन करण्याची ताकद देवो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

🕊️ “चांगले माणसं शरीरानं जातात… पण त्यांच्या कामातून कायम जिवंत राहतात.”