शहरवासीयांसाठी ३४ वातानुकूलित ई-बस सेवेत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

२ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत धावणार ई-बस; चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प आणि मिटमिटा शाळेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन

शहरवासीयांसाठी ३४ वातानुकूलित ई-बस सेवेत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
शहरवासीयांसाठी ३४ वातानुकूलित ई-बस सेवेत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (१ नोव्हेंबर) करण्यात आले. या बस सोमवार, २ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-बस सेवेसह शहरातील विविध विकासप्रकल्पांचेही लोकार्पण करण्यात आले. यामध्ये ई-व्ही चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प आणि मिटमिटा येथील महानगरपालिकेच्या नवीन शाळेच्या इमारतीचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

३४ आधुनिक ई-बस उद्यापासून रस्त्यावर

नव्याने दाखल झालेल्या या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे शहरवासीयांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नऊ मीटर लांबीच्या प्रत्येक बसमध्ये ३२ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. जीपीएस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा आणि जलद चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह वायुप्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे. पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे.

शहरात ई-व्ही चार्जिंग स्टेशनची सुविधा

इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या सोयीसाठी कॅनॉट गार्डन आणि बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या ई-व्ही चार्जिंग स्टेशनचेही लोकार्पण करण्यात आले. भविष्यात शहरात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या वीजखर्चात बचत होण्यासह अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.

मिटमिटा येथे २४ वर्गखोल्यांची आधुनिक शाळा

मिटमिटा येथील देवगिरी व्हॅली परिसरात महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगणासह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी मनपाकडून ५९.१४ लाखांची मदत

या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.

शहरातील सार्वजनिक वाहतूक, शिक्षण आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित