धर्माच्या राजकारणावर विकासाचा घणाघात! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा
✍️ महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि १५ :- सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे उत्साहात पार पडला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर थेट निशाणा साधला.
“हा केवळ सत्कार सोहळा नसून जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
आमदार सत्तार म्हणाले की, विरोधकांनी निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळला, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सिल्लोडच्या जनतेने कामाला महत्त्व देत विकासाच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.
“येथे मत जात-धर्मावर नाही तर कामावर दिले जाते. शिवसेनेने मत मागितले ते विकासाच्या मुद्द्यावर, ठोस नेतृत्वावर आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारावर. मतदारांनीही भरभरून प्रतिसाद देत विजय मिळवून दिला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष अब्दुल समीर, अब्दुल आमेर, देविदास पालोदकर, केशवराव तायडे, अर्जुन गाढे, राजूबाबा काळे, निकिता काळे, डॉ. विजया जाधव, शेषराव सोनवणे, दारासिंग चव्हाण, रजनीताई नगरे, अब्दुल समद अलमोहम्मदी, शेख सलिम, लवराज महाजन, बाबुराव काकडे, निजाम पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सिल्लोड–सोयगाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली.
जनतेने दिलेला हा विश्वास विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल!