दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘हम हैं’चा पुढाकार! सिल्लोडमध्ये ४५ स्वयंसेवकांचा मेळावा; गावोगावी होणार सर्वेक्षण

शेतकऱ्यांना मानसिक आधारासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम; सरपंच, ग्रामसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘हम हैं’चा पुढाकार! सिल्लोडमध्ये ४५ स्वयंसेवकांचा मेळावा; गावोगावी होणार सर्वेक्षण

सिल्लोड दि. २ :- दुष्काळाच्या तीव्र संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व मानसिक आधार पोहोचवण्यासाठी ‘हम हैं : शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मार्गदर्शन व सहाय्य कार्यक्रम’ हा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी सिल्लोड येथील एमटीडीसी हॉटेलमध्ये ग्रामीण स्वयंसेवकांचा पहिला मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन आणि सोयगाव तालुक्यांतील विविध गावांमधून सुमारे ४५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यात सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांचाही सहभाग होता.

एमजीएम ट्रस्ट, एमजीएम विद्यापीठ, माइंड्स इन मोशन फाउंडेशन, ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरम आणि भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एमजीएम ट्रस्टचे सचिव अंकुशराव कदम हे या कार्यक्रमाचे संरक्षक आहेत.

दुष्काळामुळे आर्थिक अडचणी, कर्जाचा ताण आणि मानसिक चिंतेत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रत्येक गावात एका समन्वयक स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित स्वयंसेवक शेतकरी कुटुंबांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना कर्जमाफी, पीएम किसान योजना, पीक विमा आणि दुष्काळी मदत यांसारख्या शासकीय सुविधांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

दुष्काळग्रस्त गावांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार

एमजीएम विद्यापीठाच्या सामाजिक विज्ञान विभागाचे संचालक डॉ. रमेश जरे यांनी स्वयंसेवकांना दुष्काळग्रस्त भागात काम करताना घ्यावयाची काळजी, क्षेत्रीय कामाचे नियम, प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण आणि सर्वेक्षणाची शास्त्रशुद्ध पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ माहिती संकलित करणे नव्हे, तर शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यापर्यंत योग्य मदत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माइंड्स इन मोशन फाउंडेशनचे संचालक अब्दुल बासित सिद्दीकी यांनी हा उपक्रम कोणतीही सरकारी योजना नसून विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारी मानवतावादी मोहीम असल्याचे सांगितले. स्वयंसेवकांनी प्रत्येक कुटुंबाशी आदराने आणि सहानुभूतीने संवाद साधावा, नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी तसेच धर्म, जात आणि लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरमचे मौलाना मोहम्मद जुनैद फारूकी यांनी मानवतेच्या सेवेला सर्वोच्च महत्त्व देत, समाजातील कोणताही भेदभाव बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी सेवा असल्याचे भावनिक आवाहन केले.

मानसिक तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठीही मदतीचा हात

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटासोबतच मानसिक तणावाचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मनातील चिंता आणि समस्या मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी संकोच करू नये, असे आयोजकांनी सांगितले. मानसिक आरोग्यविषयक मदतीसाठी केंद्र सरकारच्या टेली-मानस सेवेच्या १४४१६ या मोफत हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही यावेळी देण्यात आली.

येत्या काळात स्वयंसेवकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण मोहीम सुरू केली जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या गरजा आणि उपलब्ध शासकीय योजनांमधील अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असणार आहे.

या मेळाव्याला एमजीएम सामाजिक विज्ञान विभागाचे संचालक डॉ. रमेश जरे, मौलाना जुनैद फारूकी, अब्दुल बासित सिद्दीकी, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वसीम अहमद, सिल्लोडचे पंचायत समिती सदस्य नारायण खोमणे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान बनसोड, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम आझाद, रुचिकेत जगताप, निलोफर शेख, माजी सरपंच अंकुश पाटील, मुस्ताक शेख, सद्दाम मुल्तानी, रकिब मुल्ला यांच्यासह विविध गावांतील स्वयंसेवक उपस्थित होते.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष आधार देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘हम हैं’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित