फुलंब्रीत SIR प्रक्रियेवरून वातावरण तापले; कथित बनावट आक्षेपांविरोधात तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन, आमरण उपोषणाचा इशारा

फुलंब्रीत SIR प्रक्रियेवरून वातावरण तापले; कथित बनावट आक्षेपांविरोधात तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन, आमरण उपोषणाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान फुलंब्री येथील मतदार नागरिकांविरोधात कथित खोटे आणि बनावट आक्षेप नोंदविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ फुलंब्री तहसील कार्यालयासमोर सोमवार, २ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून, फरहान मन्सूर शहा हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण तसेच नगरपालिकेतील सर्व सभापती आणि नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे.

सदर प्रक्रियेत नागरिकांविरोधात चुकीच्या पद्धतीने आक्षेप दाखल करणाऱ्यांची चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या आंदोलनात फुलंब्री शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांनी केले आहे.

आंदोलनाचा तपशील :

- दिनांक : सोमवार, २ नोव्हेंबर २०२६

- वेळ : सकाळी ११ वाजता

- स्थळ : तहसील कार्यालय, फुलंब्री

- आंदोलनाचे स्वरूप : धरणे आंदोलन व आमरण उपोषण

- उपोषणकर्ते : फरहान मन्सूर शहा

SIR प्रक्रियेतील आक्षेपांवरून आता फुलंब्रीत आंदोलनाचे पडसाद उमटणार असून, प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित