सतीश चव्हाणांना सत्तारांचा सणसणीत टोला! 'घात-अपघात सोडा, १८ वर्षांत काय केले ते आधी सांगा'; पुढेही प्रतापसिंह पाटीलच राहणार, सत्तारांचा दावा!

सतीश चव्हाणांना सत्तारांचा सणसणीत टोला! 'घात-अपघात सोडा, १८ वर्षांत काय केले ते आधी सांगा'; पुढेही प्रतापसिंह पाटीलच राहणार, सत्तारांचा दावा!
सतीश चव्हाणांना सत्तारांचा सणसणीत टोला! 'घात-अपघात सोडा, १८ वर्षांत काय केले ते आधी सांगा'; पुढेही प्रतापसिंह पाटीलच राहणार, सत्तारांचा दावा!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. पराभवामागे मित्रपक्षांनी घात केल्याचा आरोप करणाऱ्या चव्हाणांना अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'घात झाला की अपघात झाला, यापेक्षा १८ वर्षे पदावर असताना तुम्ही काय केले, याचे उत्तर आधी जनतेला द्या,' असा थेट सवाल करत सत्तार यांनी चव्हाणांवर निशाणा साधला.

सतीश चव्हाण यांनी निवडणुकीतील पराभवानंतर मित्रपक्षांतील काही जणांनी गुपचूप विरोध केल्याचा आरोप केला होता. तसेच २०२९ च्या निवडणुकीसाठी हा केवळ ट्रेलर असल्याचा इशाराही दिला होता. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले, "घात आहे की अपघात आहे, हा प्रश्न सोडा. सहा वर्षे खूप मोठा कालावधी असतो. रोज घात झाला की अपघात झाला, हेच सांगत बसू नका. 'जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान!' प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे मिळतात."

पुढे चव्हाणांच्या १८ वर्षांच्या आमदारकीचा उल्लेख करत सत्तार यांनी त्यांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "हजारो मतांनी एखादा उमेदवार पराभूत होतो, तेव्हा त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. १८ वर्षे तुम्ही काय केले, याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. त्या प्रश्नाचे उत्तर न देता घात आणि अपघाताच्या गोष्टी करणे म्हणजे 'दिल को समझाने को ये खयाल अच्छा है, गालिब!' असा टोमणाही त्यांनी मारला.

'पागल' शब्दाचा वापर; धमक्यांना सत्तारांचे थेट आव्हान!

सतीश चव्हाण यांनी दिलेल्या २०२९ च्या इशाऱ्यावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला. "तो काय आम्हाला फासावर लटकवून टाकणार आहे का? अरे पागल... माणूस जेव्हा पागल होतो, तेव्हा अशा गोष्टी करतो. आम्ही राजकारणात कोणताही लपूनछपून प्रचार केलेला नाही. उघडपणे प्रचार केला आहे. त्यात कोणतीही शंका नाही," असे सत्तार म्हणाले.

"अशा सुक्या धमक्या दुसऱ्याला द्याव्यात. आमच्यासारख्या माणसाला अशा धमक्या चालत नाहीत," असे म्हणत त्यांनी चव्हाणांना थेट आव्हान दिले.

प्रतापसिंह पाटलांच्या विजयाचेही केले समर्थन

निवडणुकीत आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी अवघ्या १५ दिवसांत सुमारे ८० हजार मते मिळवल्याच्या मुद्द्यावरही सत्तार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "प्रतापसिंह पाटील राजकारणात नव्हते का? त्यांचे बंधू आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या मेडिकल कॉलेज, शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज आणि इतर शैक्षणिक संस्था आहेत. त्यांनी या संस्था स्वतः उभ्या केल्या आहेत. दुसऱ्याच्या हिसकावून घेतलेल्या नाहीत. त्यांचे वडील वेदप्रकाशजी हे मराठवाडा विद्यापीठाचे आदर्श कुलगुरू म्हणून ओळखले जातात."

'२०२९ ची वाट कशाला पाहता, कार्यक्रम आम्हीच करणार!'

२०२९ मध्ये कार्यक्रम करण्याच्या चव्हाणांच्या इशाऱ्याला उत्तर देताना सत्तार यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. "कार्यक्रमाची वेळ ठरवून घ्या. तुमच्या टीव्ही चॅनेलवर कुठे कार्यक्रम करायचा ते सांगा. आम्ही तिथे हजर राहू, कार्यक्रम करायलाही आणि ऐकायलाही. २०२९ ची वाट पाहण्याची गरज नाही. कार्यक्रम आम्हीच करणार आहोत. कुठे कार्यक्रम करायचा, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा संदर्भ देत सत्तार यांनी टोलेबाजी केली. "प्रतापसिंह पाटील हे एमडी आहेत. ऑपरेशन करणारा डॉक्टरच ऑपरेशन करू शकतो. आमच्याकडे तितकी साधने नसतील, पण त्यांच्याकडे सर्व काही आहे," असे म्हणत त्यांनी चव्हाणांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

"सहा वर्षांनंतरही ऐतिहासिक निर्णय हाच राहील आणि आमदार प्रतापसिंह पाटील हेच राहतील," असा ठाम दावा करत अब्दुल सत्तार यांनी आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले.

पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला असला, तरी त्याचे राजकीय पडसाद थांबण्याची चिन्हे नाहीत. चव्हाणांचा 'घाताचा' आरोप आणि सत्तारांचे आक्रमक प्रत्युत्तर यामुळे मराठवाड्यातील महायुती-मित्रपक्षांमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित