दुःखात सहभागी होत आमदार अब्दुल सत्तारांनी साजरी केली माणुसकीची दिवाळी! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला आधार
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ८ :- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, शेतकरी आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या घरांमध्ये सणाचा आनंदही हरवलेला असतो. अशा कुटुंबांच्या वेदना समजून घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत आमदार अब्दुल सत्तार यांनी माणुसकीची दिवाळी साजरी केली.
सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील धानोरा (ता. सिल्लोड) येथे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. दीपक माधवराव काकडे यांनी गेल्या महिन्यात, तर सीताराम भागाजी काकडे यांनी मे २०२६ मध्ये आत्महत्या केली होती. या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सत्तार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दिवाळीनिमित्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन, मुलांना सायकली, कपडे, फटाके तसेच सणासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केवळ मदतीचा हात देऊन न थांबता त्यांनी कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. यावेळी त्यांच्या घरातील पारंपरिक ग्रामीण पद्धतीचे भाकरी-पिठल्याचे जेवणही त्यांनी घेतले.
संकटाच्या काळात संबंधित कुटुंबांनी स्वतःला एकटे समजू नये, समाजातील माणसे त्यांच्या पाठीशी आहेत, हा विश्वास देण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला. शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे दिवस यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
शेतकरी आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी संकटग्रस्त कुटुंबांना वेळीच आधार, संवाद आणि सहकार्य मिळणे गरजेचे आहे. आर्थिक व कौटुंबिक अडचणींमध्ये असलेल्या व्यक्तींनी टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी मदतीसाठी पुढे यावे आणि समाजानेही अशा कुटुंबांच्या पाठीशी उभे राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, डॉ. दिनेश साळवे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, अक्षय मगर यांच्यासह बाळू काकडे, रवींद्र काकडे, गजानन काकडे, अजिनाथ काकडे, हरिश्चंद्र काकडे, जगन्नाथ काकडे, नारायण काकडे, शिवाजी विसपुते, गणेश काकडे, आत्माराम मस्के, माधवराव काकडे, मनोज माधवराव काकडे, रामभाऊ काकडे, ज्ञानेश्वर काकडे, सचिन काकडे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संबंधित कुटुंबीय उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित