जिल्हा परिषदेत ठाकरे गटाचे मनोज पेरे यांची गटनेतेपदी निवड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १७ :- शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटनेतेपदी मनोज नंदकिशोर पेरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीन जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करणारे मनोज पेरे यांनी २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ‘मशाल’ चिन्हावर विजय मिळवला होता. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांती चौक येथील मातृभूमी प्रतिष्ठाणमध्ये सर्व निवडून आलेल्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.
या बैठकीत सर्व सदस्यांच्या एकमताने मनोज पेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद सभागृहात त्यांची गटनेतेपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
ही घोषणा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी करत पेरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
👉 जिल्हा परिषदेत ठाकरे गटाची ताकद वाढवणारा हा निर्णय राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे!