जि.प.च्या नूतन इमारतीत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याची मागणी; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सकारात्मक प्रतिसाद

जि.प.च्या नूतन इमारतीत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याची मागणी; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ ऑगस्ट:– छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेचे जनक स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार सतीष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय शिरसाट यांची सदिच्छा भेट घेतली.

पूर्वीची जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ही निजामकालीन वास्तूत होती. ती जीर्ण झाल्याने शासनाने नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे काम हाती घेतले असून आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना अस्तित्वात आली. त्यामुळे या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी नूतन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथराव जाधव, प्रा. विजय पाथ्रीकर, उदयसेन देशमुख, त्रिंबकराव पाथ्रीकर, दिलीप बनकर, प्रा. देगावकर, दत्ता भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

– महाराष्ट्र वाणी

"वार्ता खरी, आवाज तुमचा"