गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना आता Mahadbt वर थेट; शेतकऱ्यांना तत्काळ मदत!

गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना आता Mahadbt वर थेट; शेतकऱ्यांना तत्काळ मदत!

महाराष्ट्र वाणी 

मुंबई दि ४ :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता Mahadbt पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना मदत जलदगतीने पोहोचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतीच्या कामात होणारे अपघात, मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व वाढत चालल्याने अनेक कुटुंबांवर मोठे संकट येते. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना सुरू केली. योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

योजनेची प्रक्रिया पूर्वी ऑफलाइन होती; मात्र आता अर्ज, तपासणी आणि मंजुरी या सर्व टप्प्यांचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्यात आले आहे.

२०२५-२६ या वर्षासाठी योजनेसाठी १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ४,३५९ शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी देत ८८.१९ कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.